
रायगड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। एआय युगातील वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड–अलिबाग आणि जिल्हा न्यायालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर क्राईम आणि सायबर कायदे” या विषयावर विधी साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बॉम्बे हायकोर्टचे सायबर कायदा तज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
अॅड. माळी यांनी आपल्या भाषणात डिजिटल जगातील वाढते सायबर गुन्हे, त्यांचे सामाजिक व आर्थिक परिणाम तसेच नागरिकांनी घ्यावयाची काळजी यावर सखोल विवेचन केले. त्यांनी ऑनलाइन फसवणूक, डेटा चोरी, बनावट ओळख निर्मिती, सोशल मीडियाचा गैरवापर यांसारख्या गुन्ह्यांचे प्रकार सांगून त्यापासून वाचण्यासाठी योग्य ती डिजिटल खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. तसेच सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदविण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक १९३० उपलब्ध असल्याची माहितीही दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राजेंद्र द. सावंत होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये जिल्हा न्यायाधीश सृष्टी नीलकंठ, एस. डी. भगत, मुख्य न्यायदंडाधिकारी ए. बी. अत्तार आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश बी. बी. गवारे यांची उपस्थिती होती.
सृष्टी नीलकंठ यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “डिजिटल जगात प्रत्येकाने तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करणे अत्यावश्यक आहे. जागरूक नागरिक झाल्यास सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण शक्य आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके