कर्जत तालुक्यात 1761 हेक्टर भात शेतीचे नुकसान
रायगड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाने पुन्हा एकदा संकट ओढवले आहे. तालुक्यात तब्बल 1761 हेक्टर भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे भात पिके आडवी ह
मुंबईसह रायगड, कोल्हापूरमध्ये पावसाचा कहर; पिकांवर परिणाम


रायगड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।

कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाने पुन्हा एकदा संकट ओढवले आहे. तालुक्यात तब्बल 1761 हेक्टर भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे भात पिके आडवी होऊन सडली असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे.

दसऱ्यानंतर सुरू झालेल्या मुसळधार आणि परतीच्या पावसाने भात कापणीच्या अगोदरच पिकांची नासधूस केली. काही शेतकऱ्यांनी अर्धवट कापणी केलेली असतानाच पुढील पावसाने उरलेले पीक सुद्धा नष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांकडून सरकारकडे एकरी किमान ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई तसेच भाताला प्रतिक्विंटल ४ हजार रुपयांचा हमीभाव देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, महसूल आणि कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. या संदर्भात घेतलेल्या बैठकीत ३० ऑक्टोबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत तालुक्यातील २०८ गावांची पाहणी पूर्ण झाली असून १७१.८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत.

कृषी अधिकारी राजाराम शिंदे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीनुसार सरसकट नुकसानभरपाई देण्यात येईल. पंचनामे प्रामाणिकपणे आणि तातडीने पार पाडले जात आहेत.” सतत बदलणाऱ्या हवामानामुळे भात शेतीवर नैसर्गिक आपत्तीचे सावट पुन्हा एकदा गडद झाले आहे. बळीराजा सध्या खर्च, कर्ज आणि पिकनुकसानीच्या दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाकडून त्वरित मदत व आर्थिक दिलासा मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande