
सोलापूर, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। देशात व राज्यात दहशतवादी कारवायांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. हा आदेश २७ ऑक्टोबर २०२५ पासून पुढील ६० दिवस प्रभावी राहणार असून, याबाबतचे पत्रक अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी जारी केले आहे.
या आदेशानुसार, जिल्ह्यातील घरमालक, प्रॉपर्टी डिलर, वाहन विक्रेते, भाडेकरू सेवा पुरवठादार, तसेच धार्मिक स्थळांचे विश्वस्त व काळजीवाहक यांना खालील बाबींवर बंदी घालण्यात आली आहे:
प्रतिबंधित कृत्ये
1. नवीन अनोळखी व्यक्तींना निवासासाठी जागा उपलब्ध करून देताना पोलीस ठाण्याला माहिती न देणे
- अशा व्यक्तींची संपूर्ण माहिती संबंधित पोलीस ठाण्याला तात्काळ देणे बंधनकारक आहे.
2.जुने वाहन खरेदी-विक्री किंवा भाड्याने देताना अनोळखी व्यक्तींची माहिती पोलीस ठाण्याला न देणे
- वाहन व्यवहारात सहभागी होणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीची माहिती पोलीस ठाण्याला देणे आवश्यक आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड