
लातूर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।
लातूर परिसरात पडलेला पाऊस पाऊस नव्हता भविष्यातील वातावरण बदलांच्या दुष्परिणामांचा अंदाज देणारा गंभीर इशारा होता, असे पर्यावरण प्रेमींनी आपले मत नोंदवले आहे. मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने लातूर, धाराशिव सोलापूर या तीन जिल्ह्यांना अक्षरशः धुवून काढले आहे. शेत, शेत जमिनी, पीक पशुधन यांच्यावर या पावसाचा व्यक्त करता न येण्यासारखा दुष्परिणाम झालेला आहे. या सर्वांचे मूळ कारण म्हणजे जमिनीचं वाढत असलेलं तापमान....
विचार केला तर या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणारे उद्योगधंदे किंवा मोठमोठे कारखाने नाहीत. पण महत्त्वाचा भाग म्हणजे सर्वात कमी वनक्षेत्र असलेले हे प्रदेश त्यातल्या त्यात लातूर जिल्ह्यात सगळ्यात कमी वनक्षेत्र असलेला भाग आहे. इतकं असूनही या भागात वृक्ष लागवड किंवा वृक्ष संगोपन नावाकरिताच आहे. कागदावरचा हिशोब पाहिला तर प्रशासनाद्वारे दरवर्षी कोट्यावधी झाडे लावून वर्तमानपत्रांमध्ये समाज माध्यमांमध्ये त्यांची प्रसिद्धी केली जाते... पण ती झाडे जगवली जात नाहीत.
वृक्ष लागवडी पेक्षा वृक्ष तोडण्याचा वेग या ठिकाणी सर्वाधिक आहे. दररोज शेकडो वाहनांनी तोडलेली लाकडे कटाई छटाई करिता मार्केटमध्ये येतात हे दृश्य दिसून येतं. शेत जमिनी उजाड झालेल्या आहेत, परिसरातील टेकड्या डोंगर उजाड बोकाड झालेली आहेत, हायवे बनवण्याच्या नावाखाली रस्ता दुतर्फा सगळी झाडे कापून काढली....
लातूर शहरांमध्ये ज्या संघटनांनी वृक्ष लागवड करून ग्रीन लातूर ची पायाभरणी केली आहे त्यांना देखील प्रशासन सहकार्य करत नाही इतकी गंभीर बाब आहे.
जमिनीवर हरित आच्छादन नसेल तर जमिनीचे तापमान नक्कीच वाढेल याशिवाय महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या लातूर शहरांमध्ये रेल्वेने पिण्याचे पाणी आलं होतं त्या ठिकाणी जल पुनर्भरण हे देखील नावापुरतं किंवा कागदपत्रे असतं.... किती प्रमाणात जल पुनर्भरण झाला आहे त्याद्वारे जमिनीची पाण्याची पातळी किती वाढत आहे याचा कधीही अभ्यास होत नाही किंवा अभ्यास झालेला किंवा त्याची माहिती मिळत नाही.
वर्षानुवर्ष कोट्यावधीचे वृक्ष लागवड होऊनही या परिसराचा हरित आच्छादन वाढत नाही, का वाढत नाही किती वाढला आहे हे देखील कळायला भाग नसतो.
मागील कित्येक वर्ष एक झाड लावून अफाट प्रसिद्धी करणाऱ्या, देवराई च्या नावावरती दिशाभूल करणाऱ्या लोकांनी, गावागावांमध्ये जाऊन कमिट्या स्थापन करणाऱ्या लोकांनी देखील सरकारला प्रशासनाला फोटो काढण्यामध्ये आणि फोटो व्हायरल करण्यामध्ये सहकार्य केलेले आहे.
तापमान वाढ, जमिनीतील पाण्याची पातळी कमी होणे, अतिवृष्टी, वृक्षतोड या प्रकारांकडे आता गंभीरतेने पाहणं गरजेचं आहे. जमिनीत पावसाचा प्रत्येक थेंब जिरवणे महत्वाचे आहे. वृक्षतोड शंभर टक्के बंद होणे गरजेचे आहे. आक्रमकपणे झाड लावणं आणि ती झाड जगवण याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis