
तालुक्यातील १५५ व्यापाऱ्यांचा सहभाग
लातूर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। साथी पोर्टल-२' विरोधात अहमदपूरमधील कृषी विक्रेत्यांनी बंद पाळला.
राज्य सरकारच्या कृषी विभागाने प्रस्तावित केलेल्या 'साथी ॲप टू' पोर्टलच्या सक्तीला विरोध दर्शवण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील खत व बियाणे विक्रेत्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवून तीव्र आंदोलन केले. 'साथी पोर्टल-२' च्या अंमलबजावणीला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी अहमदपूर सीड्स फर्टीलायझर असोसिएशनने केली आहे.
माफदाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, 'साथी पोर्टल'चा मूळ उद्देश शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार प्रतीचे बियाणे उपलब्ध करणे हा आहे. मात्र, दर्जेदार बियाण्यांची निर्मिती आणि पुरवठा करण्याची महत्त्वाची जबाबदारी बियाणे उत्पादक कंपन्यांची असल्याने, हे पोर्टल त्यांच्यासाठी म्हणजे 'साथी पोर्टल-१' कंपन्यांना लागू करावे.याउलट, सध्या विक्रेत्यांवर सक्ती करण्यात येत असलेले 'साथी पोर्टल-२' हे व्यवहार्य नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
विक्रेत्यांनी 'साथी पोर्टल-२' वापरण्यास व्यवहार्य नसण्याची अनेक कारणे स्पष्ट केली आहेत.इंटरनेट-सुविधांचा अभाव: राज्यातील विशेषतः दुर्गम आणि अतिदुर्गम भागांत संगणक, इंटरनेट आणि स्कॅनरसारख्या अत्यावश्यक साधनांचा अभाव आहे.विक्रीचा मोठा दबाव: कृषी हंगामाच्या सुरुवातीला विक्रेत्यांवर एकाच वेळी अनेक उत्पादने विक्री करण्याचा मोठा दबाव असतो. अशा परिस्थितीत पोर्टलवर नोंदी करणे वेळखाऊ ठरते.अव्यवहार्यता: ही परिस्थिती पाहता, 'साथी पोर्टल-२' चा वापर करणे शेतकरी आणि विक्रेते दोघांसाठीही व्यवहारिकदृष्ट्या अशक्य आहे.
अहमदपूर सीड्स फर्टीलायझर असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या या बंदमध्ये तालुक्यातील १५५ कृषी व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला.
या आंदोलनात अहमदपूर, किनगाव, शिरूर ताजबंद, हाडोळती, खंडाळी येथील प्रमुख कृषी सेवा केंद्रांनी सहभाग घेतला,
विक्रेत्यांनी शासनाला तातडीने 'साथी पोर्टल-२' च्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याची मागणी केली असून, या मागणीवर सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis