
अकोला, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।अकोला महानगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व थकीत मालमत्ता धारकांसाठी मोठा दिलासा दिला आहे. थकीत मालमत्ता करावर लागणाऱ्या व्याज व शास्ती पैकी ७५ टक्के शास्ती माफ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.ही संधी ३१ ऑक्टोबरपर्यंत असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहेत.
महानगरपालिकेच्या कर विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अनेक नागरिकांनी आपला मालमत्ता कर अद्याप भरलेला नाही. त्यामुळे थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी आणि महसूलवसुली वाढवण्यासाठी ही विशेष सवलत योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत करदात्यांनी फक्त मूलभूत थकीत रक्कम आणि उर्वरित २५ टक्के शास्ती भरल्यास, उर्वरित ७५ टक्के शास्तीची माफी दिली जाईल. यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून महापालिकेलाही थकीत कर वसुलीला वेग येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही योजना फक्त ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतच लागू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील तीन दिवसांच्या आत आपला थकीत मालमत्ता कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर विभागाने केले आहे. महापालिकेच्या कर विभागाने पुढे सांगितले की, नागरिकांनी ही सवलत मिळवण्यासाठी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात किंवा ऑनलाइन माध्यमातून कर भरावा. वेळेत कर न भरल्यास ही शास्तीमाफी योजना आपोआप रद्द होणार असून त्यानंतर संपूर्ण व्याज आणि शास्ती आकारली जाईल
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे