
रायगड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठी साहित्याचा प्रसार, प्रचार आणि संवर्धनासाठी मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, तसेच कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कोकण साहित्य परिषद शाखा अलिबाग यांच्या सहकार्याने दोन दिवसीय जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे संमेलन दिनांक ८ व ९ नोव्हेंबर रोजी भंडारी भवन, श्रीबाग, अलिबाग येथे पार पडणार आहे. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय काव्यलेखन, कथालेखन व दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी, गीतकार अरुण म्हात्रे तर स्वागताध्यक्ष म्हणून रायगडचे कवी व लेखक रमेश धनावडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संमेलन कार्यकारिणी प्रमुख सौ. सुजाता पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सन्माननीय सदस्य भरत गावडे व विठ्ठल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाचे आयोजन होणार आहे. स्पर्धांसाठी संपर्क व्यक्ती म्हणून – काव्यलेखनासाठी दीपक पाटील (८८०६८०२१७५), कवितालेखनासाठी रुपेश पाटील (८०८७५५८६४१) आणि दिवाळी अंक स्पर्धेसाठी महेश कवळे (९४२११७१४८०) यांची नेमणूक करण्यात आली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्व साहित्यप्रेमींनी संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. संमेलनादरम्यान चर्चासत्र, परिसंवाद, काव्यकट्टा, कथावाचन, व्याख्यान व सांस्कृतिक आविष्कार यांसारखे विविध साहित्यिक कार्यक्रम होणार आहेत.
या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी माजी जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रसाद पाटील, माजी प्राचार्या संजिवनी नाईक, समन्वयक एम. एस. बोघाणी, युवा कवी विजय म्हात्रे आणि कोकण साहित्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य मेहनत घेत आहेत. प्रसिद्धी : प्रकल्प वाणी, अध्यक्ष – कलारंग
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके