
अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.) | येथील भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीव घेण्याची आणि गँगरेप करण्याची धमकी देत अश्लील शब्दांत शिवीगाळ करणारे पत्र पाठविण्यात आले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापूर्वीही नवनीत राणा यांना अशाच प्रकारे अनेकदा धमक्या देण्यात आल्या असून, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे धमकीचे पत्र हैदराबाद येथील जावेद नावाच्या व्यक्तीकडून स्पीड पोस्टच्या माध्यमातून थेट राणा यांच्या कार्यालयात पाठविण्यात आले आहे. पत्रात अत्यंत हीन आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली आहे.
या संदर्भात नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक मंगेश कोकाटे यांनी त्वरित राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून पत्र कोणत्या उद्देशाने पाठविण्यात आले याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.
नवनीत राणा यांच्यावर नुकत्याच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय कारणांनी वादंग निर्माण झाले असताना या धमकीच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. महिला नेत्यांना वारंवार दिल्या जाणाऱ्या अशा धमक्यांवर कठोर कारवाईची मागणी वाढत आहे. राजापेठ पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी