छ.संभाजीनगर : ६ नोव्हेंबरला सर्व तहसिल, उपविभागीय कार्यालयात विशेष कॅम्प
छत्रपती संभाजीनगर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध व्यक्ति- संस्था यांच्याकडून मंत्री महोदयांकडे निवेदने, तक्रारी देत असतात ही सर्व निवेदने, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी गुरुवार दि.६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तहसिल,
तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी


छत्रपती संभाजीनगर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध व्यक्ति- संस्था यांच्याकडून मंत्री महोदयांकडे निवेदने, तक्रारी देत असतात ही सर्व निवेदने, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी गुरुवार दि.६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तहसिल, उपविभागीय कार्यालयांमध्ये एकाच दिवशी विशेष कॅम्प आयोजीत करुन तक्रारींचा निपटारा करण्यात येईल,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व विभागांना दिले आहेत.

या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजीत करण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, संगिता राठोड, संगिता सानप तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. क्षेत्रीय अधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

जिल्ह्यातील प्राप्त तक्रारी, निवेदनांचे निराकरण करण्याबाबत निपटारा तक्रारींचा हा उपक्रम राबविण्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी घोषीत केले. त्यानुसार, नागरिकांनी मंत्री महोदय तसेच अन्य वरिष्ठ पातळीवर सादर केलेल्या विविध तक्रारी व निवेदनांच्या तात्काळ आणि प्रभावी निपटाऱ्यासाठी महसूल विभागाकडून ‘निपटारा तक्रारींचा’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेत दि. २७ ऑक्टोंबर २०२५ अखेर प्राप्त सर्व तक्रारींचा समावेश करण्यात येऊन त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालयात विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्थानिक पातळीवरील मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आदी या अभियानात सहभागी होतील, नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी, अर्ज, निवेदने यांचा सखोल आढावा घेऊन प्रत्यक्ष निवारण करण्यात येईल. या अभियानात प्रत्येक तालुक्यातील अधिकारी यांनी तक्रारींचा पाठपुरावा करून, तक्रारदारांशी संपर्क साधून त्यांच्या निवेदनांचा निकाल कायदेशीर चौकटीत काढावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. तक्रारींच्या कार्यवाहीची संपूर्ण नोंद ठेवून, ज्यांच्या अर्जांचा निपटारा झाला आहे त्यांना लेखी स्वरूपात कळविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

या मोहिमेत सर्व प्रशासकीय विभागांचे सहकार्य अपेक्षित असून, ग्रामपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे तात्काळ निवारण हेच उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande