
अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज जुना कॉटन मार्केट परिसराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी परिसरातील फुल विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या विक्रीच्या ठिकाणांची पाहणी केली. आयुक्तांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला निर्देश दिले की, कॉटन मार्केट परिसरातील फुलवाल्यांसाठी नियोजित व योग्य जागा निश्चित करून त्यांना तिथे स्थलांतरित करण्यात यावे. परिसरातील स्वच्छतेसाठी विशेष लक्ष देऊन निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे कॉटन मार्केट परिसर अधिक स्वच्छ, सुबक आणि व्यवस्थित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच, फुलवाल्यांना हटविण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला देण्यात आले. आयुक्तांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन कचऱ्यापासून बायोगॅस व खत निर्मिती करण्याची शक्यता तपासण्याच्या सूचना दिल्या. महानगरपालिकेकडून यासाठी आवश्यक सहकार्य मिळेल, असे त्यांनी आश्वासन दिले. या पाहणीदरम्यान वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश रघटाटे, उपअभियंता प्रमोद इंगोले, दिनेश हंबर्डे, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक विजय बुरे, स्वास्थ निरीक्षक प्रशांत गावनेर, धनिराम कलोसे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी