
नाशिक, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। सेवेकऱ्यांनी केलेल्या निष्काम सेवेमुळे श्री दत्तप्रभूची कृपा होऊन राष्ट्रावरील सारी अरिष्टे टळतील, असा विश्वास अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला. सेवामार्गाच्या गाणगापूर दत्तपीठावर ऑक्टोबर महिन्याचा मासिक सत्संग सोहळा नुकताच पार पडला. यानिमित्त विविध सेवा आणि उपक्रम संपन्न झाले. यावेळी मंदाकिनी मोरे व नितीन मोरे उपस्थित होते. त्याचप्रमाणे दि. ५ जानेवारी २०२६ रोजी उज्जैन येथे राष्ट्रीय सत्संग सोहळा, दि. २३ जानेवारी ते दि. २७ जानेवारी २०२६ रोजीदरम्यान नाशिक येथे जागतिक कृषी महोत्सव, तर दि. २० फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र पीठापूर येथील दत्तपीठावर १८ विभागांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
दरम्यान, मासिक सत्संगानिमित्त दत्तपीठावर लाखो दिवे एकाचवेळी प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला, तर पापविनाशी तीर्थावर अण्णासाहेब मोरे परिवाराने भीमा-अमरजा नद्यांचे विधिवत पूजन केले. त्याचबरोबर सलग तीन दिवस श्रीघोर कष्टोद्धारक पादुका पूजनाचा सोहळा संपन्न झाला. यासोबतच सामूहिक श्री दत्तात्रय वज्रकवच पठणाची आणि सत्यनारायण पूजेची सेवा श्रींच्या चरणी समर्पित केली. या सर्व उपक्रमांमध्ये हजारो सेवेकरी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV