
नाशिक, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।
- नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७ चे उत्कृष्ट आणि प्रभावी नियोजन करावे. नाशिकचा लौकिक देशभरात व्हावा, असे मत कुंभमेळा मंत्री तथा मंत्री समिती प्रमुख गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा मंत्री समितीची बैठक झाली.
बैठकीस मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, उदय सामंत, पंकजा मुंडे, जयकुमार रावल, शिवेंद्रसिंह भोसले, माणिकराव कोकाटे, प्रताप सरनाईक, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाजन यांनी सांगितले की, नाशिकचा कुंभमेळा पावसाळ्यात होत असल्याने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. १२ वर्षांपूर्वीच्या अनुभवाच्या आधारे भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजन करावे.
मंत्री उदय सामंत यांनी डिसेंबरमधील विश्व मराठी साहित्य संमेलनादरम्यान कुंभमेळ्याचे ब्रँडिंग करण्याचे सुचविले.पंकजा मुंडे यांनी नियोजन तीन टप्प्यांत करण्याचा सल्ला दिला.प्रताप सरनाईक यांनी २०० नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची सूचना केली, तर मंत्री जयकुमार रावल यांनी विमानतळ व इतर ठिकाणी व्हीआयपी सुविधा नियोजनात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडला. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी विविध विभागांच्या कामकाजाचे सादरीकरण केले. सर्व मंत्री आणि अधिकारी यांनी प्रशासनाच्या तयारीबाबत समाधान व्यक्त करून नाशिकचा कुंभमेळा देश-विदेशात आदर्श ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV