
बीड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे भेट दिली. फलटण येथे बीड जिल्ह्यातील कवडगाव येथील डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी कवडगाव येथे भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर थेट अनेक आरोप केले. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा थेट दबाव पोलीस प्रशासनावर आहे .त्यामुळे पोलीस चौकशी करत नाहीत असा गंभीर आरोप केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, 'फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा थेट दबाव पोलीस प्रशासनावर आहे .त्यामुळे पोलीस चौकशी करत नाहीत . महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळाला पाहिजे .आज या प्रकरणात एकही सत्ताधारी आमदार बोलत नाही . संपदा मुंडे ज्या समाजातील त्या समाजातील सात आमदार आहेत मात्र ते देखील यावर बोलले नाहीत .त्यांच्यावर फडणवीस यांचा दबाव आहे .पंकजा मुंडे यांना विनंती,जोपर्यंत डॉक्टर तरुणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळात राहायचं की नाही हा निर्णय घ्यावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. सत्ताधरी या संघटनेतून पळ काढत असतील तर त्याला काय म्हणायचं? नारायण गड आणि भगवानगडाला माझे साकडे या कन्येला न्याय मिळावा यासाठी त्यांनी भूमिका घ्यावी.पुढच्या काळात कुटुंबाच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू ' असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
--------------- ---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis