
नांदेड, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। आज 29 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, मोहसीन सय्यद, ग्राम महसूल अधिकारी, मनोज जाधव, माधव भिसे, बरोडा श्रीरामे, जमदाडे, मनोज सरपे, महेश जोशी, महसूल सेवक बालाजी सोनटक्के, शिवा तेलंगे या महसूल पथकाने विष्णुपुरी परिसरामध्ये पहाटे 5 वाजता अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी गस्तीवर असताना रेती उत्खनन करणारे 2 मोठ्या बोटी, एक छोटी बोट व 4 इंजिन आढळून आले.
या पथकाने मजुरांच्या साह्याने 3 बोटी व 4 इंजिन जिलेटीने स्फोट करून नष्ट केले. तसेच 30 तराफे जाळून नष्ट केले, असे एकूण 63 लाख किंमतीचा मुद्देमाल जाग्यावरच स्फोट करून नष्ट केला. एक अवैध वाहतूक करणारी हायवा एमएच 26 बीसी 4892 जप्त करून तहसील कार्यालय परिसरामध्ये लावण्यात आला आहे. सदर हायवावर दंडात्मक फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची तजवीच करण्यात आली आहे.
या कारवाई दरम्यान पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व पोलीस जमादार शिंदे, श्री. घुगे व श्री. जाधव यांचे पोलीस पथक उपलब्ध करून दिले. अवैध उत्खननासंदर्भात नांदेड महसूल प्रशासन सक्तीने कारवाई करेल असा इशारा नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis