
पालघर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। – पालघर जिल्ह्यास राज्यात अवकाळी पावसामुळे भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून त्याचे पंचनामे झाले आहेत त्याअनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत करावी अशी मागणी आमदार विलास तरे यांनी कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
यावेळी आमदार विलास तरे म्हणाले की, पालघर जिल्हा हा प्रामुख्याने आदिवासी बहुल तसेच शेतीप्रधान जिल्हा असून बहुतेक शेतकरी वर्गाचा प्रमुख उत्पन्नाचा व उदरनिर्वाहाचा स्रोत म्हणजे भात शेती आहे. या भागातील बहुसंख्य शेतकरी केवळ पावसावर आधारित शेती करतात. मात्र, यंदा माहे ऑक्टोबर महिन्यात देखील सतत व अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले असून त्याचा थेट परिणाम भात शेती, नाचणी, वरई, फुल बाग, फळ बाग तसेच, वीट उत्पादक व्यावसायिकांवर झाला आहे. भाताच्या पिकाची कापणी सुरू असतानाच झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतातील पिके आडवी झाली, पाण्याखाली गेली तसेच काही ठिकाणी पिकांचे रोपण सडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांना आर्थिक फटका बसला आहे. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी बियाणे, खत व मजुरीसाठी कर्ज घेतलेले असून, पिकाचे नुकसान झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा स्थितीत शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याअनुषंगाने आपण संबंधित महसूल अधिकारी, कृषि अधिकारी व तहसिल प्रशासन यांना तातडीने सूचना देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करून योग्य ती हानीचे मूल्यमापन करून शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत करावी अशी मागणी आमदार विलास तरे यांनी केली आहे.
यावर कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले की, आम्ही खाली सूचना दिल्या असून लवकरच शेतकऱ्यांना मदत केली जाईल. उक्त मंत्री महोदयांच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर