आधार केंद्र वाटपात अनियमितता? - पात्रांना डावलून अपात्रांना लाभाचा आरोप
रायगड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात आधार नोंदणी आणि अद्यावतीकरण केंद्रांच्या वाटप प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी किशन
आधार केंद्र वाटपात अनियमितता? — पात्रांना डावलून अपात्रांना लाभाचा आरोप


रायगड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात आधार नोंदणी आणि अद्यावतीकरण केंद्रांच्या वाटप प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करत आपली भूमिका स्पष्ट केली.

सेवा केंद्र चालकांनी आरोप केला आहे की, आधार केंद्रांचे वाटप करताना पात्र अर्जदारांना डावलून अपात्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. एका कुटुंबातील दोन व्यक्तींना आधार केंद्र देण्यात आले असून, काही ठिकाणी अशा ठिकाणीही केंद्र मंजूर झाली आहेत, जिथे नागरिकसंख्या आणि मागणी दोन्ही अत्यल्प आहेत.

नियमांनुसार ‘आपले सरकार’ केंद्र चालकांना फक्त एका केंद्रासाठी अर्ज करता येतो, तसेच शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी अर्जदार अपात्र ठरतो. मात्र कर्जत तालुक्यात पोलीस पाटील पदावर कार्यरत महिलेला केंद्र मंजूर झाल्याचे उदाहरण त्यांनी दिले आहे. दिव्यांग अर्जदारांनाही या प्रक्रियेत न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीवर्धन तालुक्यातील एका दिव्यांग अर्जदाराचा अर्ज चुकीच्या कारणावरून बाद करण्यात आला, तसेच सेतू केंद्रांवरील दाखले कृत्रिमरीत्या वाढवून दाखवल्याच्या तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात आधार केंद्रांसाठी २६८ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ९९ केंद्रांना मंजुरी मिळाली आणि ८१ केंद्रांना प्रत्यक्ष परवानगी देण्यात आली आहे. मात्र उर्वरित १८ केंद्रांचा तपशील अस्पष्ट असल्याने ही प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप ‘आपले सरकार’ केंद्र चालकांनी केला. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या सर्व बाबींची गंभीर दखल घेत योग्य ती चौकशी करून पात्रांना न्याय देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती केंद्र चालक स्वप्नील सोनावणे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande