
सोलापूर, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्यातील कैकाडी समाज तीन वेगवेगळ्या मागासवर्गीय प्रवर्गांत समाविष्ट आहे. विदर्भातील कैकाडी समाज हा अनुसूचित जातीमध्ये तर उर्वरित राज्यात हा समाज विमुक्त जातीमध्ये समावेश केला आहे. हाच समाज केंद्र शासनाच्या मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसीमध्ये समाविष्ट आहे. तीन वेगवेगळ्या प्रवर्गांत टाकल्याने कैकाडी समाजाला कोणताही लाभ मिळत नाही. त्यामुळे हैदराबाद गॅझेटनुसार समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, अशा मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
विदर्भातील कैकाडी समाज व उर्वरित राज्यातील कैकाडी समाज एकच असून, त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार होतात. त्यांच्या रीतिरिवाज, भाषा, व्यवसाय, त्यांच्या लग्न पद्धती, देव-देवता सारख्याच आहेत. तरीही या समाजाला न्याय मिळाला नाही. कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवावे यासाठी विदर्भाप्रमाणे उर्वरित राज्यातील कैकाडी समाजाने अनेक वेळा रास्ता रोको आंदोलन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड