
अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.) हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालच्या उपसागरात मोथा चक्रीवादळ सक्रिय असून विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. मात्र या निर्णयाचा फटका पहाटेपासूनच शेतकऱ्यांना बसू लागला. सकाळी सहा वाजताच बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर शेतमाल घेऊन आलेल्या ट्रॅक्टर, पिकअप, ट्रक यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शेतकऱ्यांनी “खरेदी नका करू, पण आमचा माल शेडमध्ये ठेवू द्या” अशी मागणी प्रशासनाकडे केली. परंतु बाजार बंद असल्याने त्यांना अवघड परिस्थितीचा सामना करावा लागला. वाहनांची संख्या वाढत गेल्याने बाजार समिती परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला. रस्त्यांवर वाहने अडकून राहिल्याने काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. जिल्ह्याच्या विविध भागातून सोयाबीन, तूर व इतर शेतमाल घेऊन शेतकरी दाखल झाले होते. त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सकाळी दहा वाजता गाडगेनगर पोलिसांनी बाजार समितीत दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. पावसाच्या अंदाजामुळे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय योग्य असला तरी, शेतकऱ्यांना वेळेत माहिती न मिळाल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागल्याची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी