
नाशिक, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याबरोबरच विशेष पॅकेजची मागणी केली आहे. या भेटीदरम्यान खा. वाजे यांनी कृषी मंत्री चौहान यांना सविस्तर अहवाल आणि निवेदन सादर केले. गेल्या मे महिन्यापासून जिल्ह्यात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे कांदा, द्राक्ष, सोयाबीन, भात, मका, टोमॅटो, तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके संपूर्ण उद्ध्वस्त झाली असून, शेतकऱ्यांच्या हातात काहीही राहिले नाही. यावर्षी पिकांचे नुकसान आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. बँकांकडून वसुलीच्या कारवाया सुरू आहेत. काही ठिकाणी शेतजमिनींचे लिलावही झ झाले आहेत. परिणामी, अनेक शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत, ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती असल्याचे खा. वाजे यांनी निवेदनात म्हटले आहे. बैठकीत केंद्रीय कृषिमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून, संपूर्ण अहवाल मागवून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV