
अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरातील नागरिकांचे आरोग्य सुधारावे आणि नागरिकांना सकस व आनंददायी वातावरण मिळावे या उद्देशाने “हॅप्पी स्ट्रीट प्रोग्राम” हा अभिनव उपक्रम अमरावती महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी नियोजनासाठी अमरावती महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये प्राथमिक स्वरुपाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी, विभागीय समन्वय, नागरिकांचा सहभाग, तसेच वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा आणि सांस्कृतिक उपक्रम यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि स्थानिक नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीदरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, “हॅप्पी स्ट्रीट प्रोग्राम म्हणजे केवळ एक उपक्रम नाही, तर तो शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात उत्साह निर्माण करणारा एक उपक्रम आहे. नागरिकांना आनंददायी वातावरण देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल,” असे त्या म्हणाल्या. “Raahgiri” या नावाने ओळखला जाणारा हा उपक्रम देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. आता अमरावतीतही हा उपक्रम सुरू होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरणाची निर्मिती होईल. या अंतर्गत शहरातील ठराविक मुख्य रस्त्यांवर सकाळी काही तासांसाठी वाहनांची वाहतूक बंद ठेवून नागरिकांना चालणे, धावणे, सायकल चालविणे, योगाभ्यास, नृत्य, खेळ, संगीत, कला आणि सांस्कृतिक उपक्रम अशा विविध उपक्रमाचा आनंद घेण्याची संधी दिली जाणार आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना आरोग्यवर्धक जीवनशैली स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल, तसेच सामाजिक ऐक्य वाढेल. कार्यक्रमाच्या सुरळीत आयोजनासाठी विविध विभागांमधील समन्वय, नागरिकांचा सहभाग आणि शिस्तबद्ध नियोजन यावर विशेष भर देण्यात येणार आहे. त्यांनी नागरिकांनाही आवाहन केले की, “हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक अमरावतीकराने उत्साहाने सहभाग घ्यावा आणि शहराचे नाव उज्ज्वल करावे.” अमरावती शहरातील विविध वृत्तपत्रांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. अमरावती शहरातील ज्यांनाही या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपला प्रस्ताव आयुक्त कार्यालयात देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अमरावती महानगरपालिकेचा हा उपक्रम शहराच्या नागरी जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करणार असून, नागरिकांच्या आरोग्यदायी आणि सुसंवादी जीवनशैलीकडे वाटचाल घडवून आणणारा ठरणार आहे. या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती कौशल्या एम., अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, ऍड.प्रशांत देशपांडे, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि स्थानिक नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी