
नाशिक, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।
: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी आज जिल्हा परिषदेतील विविध विभागांना अचानक भेट देऊन कर्मचाऱ्यांची उपस्थितीबाबत आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हा परिषदेत लागू करण्यात आलेल्या ऑनलाइन हजेरी ॲपवर हजेरी नमूद न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती तपासली. यामध्ये ६ कर्मचाऱ्यांनी उपस्थिती नोंदवली नसल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याच्या निर्देश सीईओ ओमकार पवार यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिल्या.
जिल्हा परिषद नाशिक प्रशासनात पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढविण्यासाठी ऑनलाइन हजेरी प्रणाली लागू करण्यात आली आहे. ही प्रणाली केवळ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीपुरती मर्यादित नसून, पुढील काळात हजेरी प्रणालीला वेतनाशी जोडले जाणार आहे त्यामुळे कोणताही कर्मचारी हजेरी नमूद न करता उपस्थित असल्याचे गृहित धरले जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.शासनाच्या ‘डिजिटल प्रशासन’ या उद्दिष्टानुसार जिल्हा परिषदेने सर्व कार्यालयांमध्ये डिजिटल पद्धतीने नोंदी ठेवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे कामकाज अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि जबाबदारीने पार पडेल. हजेरी ॲप हे या प्रक्रियेतील एक महत्त्वाचे पाऊल असून, सर्व कर्मचाऱ्यांनी दररोज वेळेवर ॲपवर हजेरी लावणे आवश्यक आहे, अन्यथा उपस्थिती गृहित धरली जाणार नाही आणि वेतनावर त्याचा परिणाम होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागप्रमुखांना निर्देश दिले की, प्रत्येक विभागात दररोज हजेरी अहवाल तपासावा, गैरहजर कर्मचाऱ्यांची कारणमीमांसा घ्यावी व शिस्तभंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच, कार्यालयीन वेळेत सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना उत्तम सेवा मिळेल याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV