
परभणी, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी शहरातील प्रभाग क्रमांक १२ सहित अनेक भागांमध्ये झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांच्या भिंती कोसळल्या, तर काहींची पत्र्यांची छप्परे उडून गेली. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना मदत देण्याची घोषणा केली असली तरी अद्यापपर्यंत संबंधित अनुदान लाभार्थ्यांच्या हाती पोहोचलेले नाही. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयाला घेराव घालण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा युवा अध्यक्ष गणेश गाढे यांनी केले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत तात्काळ अनुदान वितरणाची मागणी केली. त्यांनी आरोप केला की, अतिवृष्टी अनुदानाचे वितरण पारदर्शकपणे न होता विशिष्ट व्यक्तींच्या सांगण्यावरून निवडक लोकांना लाभ देण्यात येत आहे. यावेळी तहसील कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून अनुदान वितरण प्रक्रियेची माहिती घेण्यात आली. मात्र जर लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना न्याय मिळाला नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गणेश गाढे यांनी दिला. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे, माजी शहराध्यक्ष प्रमोद अंभोरे, जिल्हा सचिव कुमार गौरव तारु, माजी शहराध्यक्ष रणजीत मकरंद, तसेच प्रभाग क्रमांक १२ मधील रहिवासी सय्यद खदिर यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis