
परभणी, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण शहरातील चोहो बाजूंच्या चौकांमधून, रस्त्या रस्त्यांवरुन तसेच वसाहतींमधून नाल्या पूर्णतः तुंबल्या असून जागोजागी कचर्यांचे ढीगच्या ढीग साचले आहेत. खाजगी एजन्सीधारक कचरा संकलनात अक्षरशः फेल ठरला असतांनासुध्दा महापालिका प्रशासना अंतर्गत झारीतील शुक्राचार्यांद्वारे या एजन्सीधारकाचे ‘अर्थ’पूर्ण लाड सुरु आहेत.
महानगरपालिका हद्दीतील स्वच्छते बाबत प्रशासनाने खाजगी व्यक्ती, संस्थेस कंत्राट बहाल केले. परंतु, संबंधित कंत्राटदाराने आजपर्यंत अक्षरशः हात राखून काम केले. चोहोबाजूंच्या वसाहतीतील प्रमुख चौक किंवा प्रमुख रस्ते म्हणजेच दर्शनीय भागात घंटागाड्या तैनात केल्या खर्या परंतु, त्या केवळ देखाव्यापुरत्याच ठरल्या. प्रमुख चौक व प्रमुख रस्त्यांवरील काही स्पॉटवरील केर कचरा नियमितपणे हटविण्याचे काम इनामे इतबारे सुरु झाले खरे. परंतु, चोहोबाजूंच्या अंतर्गत वसाहतींमधून केर कचर्याचे ढीग हटविण्याच्या कामात संबंधित एजन्सीधारकाने कधीच गांभीर्याने स्वारस्य दाखविले नाही. कधीतरी कोणीतरी मोठी ओरड केली तर साफसफाई करीत आवाज बंद करण्याचा प्रयत्न मात्र या एजन्सीधारकाने इनामे इतबारे होत आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून म्हणजे सणा सुदीच्या काळातच या महानगरातील स्वच्छतेचे अक्षरशः तीन तेरा वाजले. प्रमुख चौक, प्रमुख रस्त्यांवर कचर्यांचे ढीगारे साचले. नाल्या आधीच तुंबल्या, त्यात हे कचर्यांचे ढीग आता नाल्यांसह रस्त्यांवर पसरले. दिवाळीच्या सणात हे चित्र प्रकर्षाने शहरवासीयांनी अनुभवले. विशेषतः दिवाळी निमित्त आपल्या गावी परतलेल्या भूमीपुत्रांनी बकाल शहराचे हे चित्र ओळखल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला. कुचकामी रस्ते, ठिकठिकाणी कचर्यांचे ढीग, तुंबलेल्या नाल्या, डासांचा प्रादुर्भाव, सर्वदूर पसरलेली दुर्गंधी हे भयावह चित्र ओळखून या भूमीपुत्रांनी सोशल मिडीयातून महानगरपालिकेंतर्गत यंत्रणेवर, स्थानिक नेतेमंडळींवर, लोकप्रतिनिधींवर कडवट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. परंतु, त्या गोष्टीची मनपा असो, संबंधित एजन्सीधारक असो किंवा लोकप्रतिनिधींनी दखल घेतलीच नाही.
अलिकडे संबंधित कंत्राटदाराने घंटागाड्यांच्या फेर्यांना मर्यादा आणल्या आहेत. परिणामी कचरा संकलनाचे काम ठप्प आहे. कंत्राटदार विरुध्द महापालिका संघर्ष कायमस्वरुपी डोकेदुखीचा विषय आहे. कंत्राटदाराचे महिनोनमहिन्यापासून प्रशासनाद्वारे बिल अदा होत नाही, अशी ओरड सुरु केली. परंतु, आपण पूर्ण क्षमतेने काम करत आहोत, असा दावा ठोकून या कंत्राटदाराने महापालिकेंतर्गत काही झारीतील शुक्राचार्यांच्या आशिर्वादाने आव्वा की सव्वा रक्कमेची बिले नियमितपणे सादर करीत महापालिकेसमोर थकीत बिलांचा डोंगर उभा करुन दिला आहे. त्यामुळेच महापालिका प्रशासन सुध्दा कंत्राटदाराच्या या मुजोरपणामुळे हादरले आहे, हतबल झाले आहेत. मनपाअंतर्गत काही अधिकारी-कर्मचार्यांचे या एजन्सीधारकाबरोबर साटेलोटे असल्याचा आरोप खूलेआमपणे होवून सुध्दा मनपाचे आयुक्त तथा प्रशासक या विषयात मौन बाळगून आहेत.
दरम्यान, संपूर्ण शहर तुंबलेल्या नाल्या, जागो जागी साचलेल्या कचर्यांच्या ढीगार्यांमुळे, दुर्गंधीमुळे अक्षरः बकाल झाले आहे. पाथरी रस्ता, जिंतूर रस्ता, जूना पेडगाव रस्ता, दर्गा रस्ता, गंगाखेड रस्ता, रायपूर रस्ता, वसमत रस्ता, कारेगांव रस्ता, वांगी रस्ता, धार रस्ता, नांदखेडा रस्ता वगैरे परिसरात दूरपर्यंत पसरलेल्या वसाहतींमधून हे भयावह चित्र किळसवाणे दिसू लागले आहे. परंतु, महानगरपालिकेंतर्गत निगरगट्ट अधिकारी, कर्मचार्यांना त्याचे सोयर सुतक नाही. बहुतांशी लोकप्रतिनिधींनाही त्याचे काहीही देणे घेणे नाही, असे दुर्देवी चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis