
नाशिक, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार दक्षता जनजागृती सप्ताहाला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. तो २ नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्यात येत आहे. यावर्षीच्या सप्ताहाची संकल्पना दक्षता : आपली सामायिक जबाबदारी, अशी निश्चित करण्यात आली आहे.
नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत या सप्ताहाचा शुभारंभकरण्यात आला. याप्रसंगी पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्या उपस्थितीत अधिकारी व अंमलदारांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देण्यात आली. तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिक्षेत्रात संपूर्ण आठवडाभर विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख ठिकाणी भ्रष्टाचारविरोधी घोषवाक्यांचे पोस्टर व बॅनर्स लावण्यात येणार असून, शासकीय, निमशासकीय व सहकारी संस्थांमध्ये भित्तिपत्रके प्रदर्शित केली जाणार आहेत. शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धांचे आयोजन केले जाईल. ग्रामीण भागातही जनजागृती मोहिमा राबविण्यात येणार आहेत. संपूर्ण सप्ताहाचे नियोजन अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, अपर अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
नागरिकांनी जर कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरोधात भ्रष्टाचारासंबंधी तक्रार नोंदवायची असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, टोल फ्री क्रमांकः १०६४, दूरध्वनी क्रमांक : ०२५३-२५७५६२८/२५७८२३०, व्हॉट्सअॅप क्रमांक: ९९३०९९७७००/९५४५६५१०६४ यावर नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV