‘पुणे ग्रॅंड टुअर 2026’ च्या बोधचिन्ह, शुभंकर व जर्सीचे पुण्यात अनावरण
पुणे, 29 ऑक्टोबर (हिं.स.) - ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळख मिळविलेल्या पुण्यामध्ये 2026 सालापासून ‘पुणे ग्रॅंड टुअर 2026’ या जागतिक व अनोख्या स्पर्धेचे आयोजन होत आहे. आज पुण्यामध्ये या उपक्रमाचे बोधचिन्हाचे, ‘इंदु’ नावाच्या शुभंकरचे व जर्सीचे अनावरण मु
पुणे ग्रॅंड टुअर 2026 बोधचिन्ह शुभंकर जर्सी अनावरण


पुणे ग्रॅंड टुअर 2026 बोधचिन्ह शुभंकर जर्सी अनावरण


पुणे ग्रॅंड टुअर 2026 बोधचिन्ह शुभंकर जर्सी अनावरण


पुणे, 29 ऑक्टोबर (हिं.स.) - ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळख मिळविलेल्या पुण्यामध्ये 2026 सालापासून ‘पुणे ग्रॅंड टुअर 2026’ या जागतिक व अनोख्या स्पर्धेचे आयोजन होत आहे. आज पुण्यामध्ये या उपक्रमाचे बोधचिन्हाचे, ‘इंदु’ नावाच्या शुभंकरचे व जर्सीचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे केंद्र सरकारच्या प्रतिनिधी या नात्याने उपस्थित होत्या.

हा केवळ एक इव्हेंट नसून अनेक सकारात्मक उद्दिष्ट यातून साकारता येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले. 1945 साली सुरु झालेली खंडाळा घाटातील सायकल स्पर्धेचा इतिहास पुण्याला आहे व सायकलचे माहेरघर असलेल्या पुण्यात या स्पर्धेचे आयोजन होणे अभिमानास्पद आहे. या स्पर्धेचे मार्ग पुण्यातील ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन, सांस्कृतिक स्थळांचे महत्व अधोरेखित होईल, सोबतच सायकलस्वारांकडे अधिक प्रमाणात आदराने पाहिले जाईल, असा विश्वास याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

विकसित भारताच्या निर्मितीमध्ये क्रीडा क्षेत्राचा देखील मोठा वाटा असणार आहे. त्या दृष्टीकोनातून भारत सरकार पूर्णपणे प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी यावेळी नमूद केले. देशाचे क्रीडा क्षेत्र समृद्ध करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांची माहिती देताना खडसे म्हणाल्या की, याचाच एक भाग म्हणून केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी गेल्या दीड वर्षापासून ‘सनडे ऑन सायकल’ सातत्याने सुरु ठेवल्याचे व देशात सुमारे पाच लाख सायकलस्वार यात सहभागी होतात. ‘फिट इंडिया’ व पर्यावरण रक्षणाचा संदेश या माध्यमातून सरकार देत असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाच्या आयोजनातून एक वारसा आपण निर्माण करणार आहोत. सायकलींकडे पुन्हा वळण्याचा, क्रीडा पर्यटनाचा उद्देश या उपक्रमाद्वारे ठेवण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू पुढे यावेत, क्रीडा संस्कृती तयार व्हावी, असा मानस असल्याचे रक्षा खडसे यांनी याप्रसंगी सांगितले.

पुणे जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र सरकार सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया - सीएफआयच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करत आहे. युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल, आशियाई सायकलिंग कॉन्फेडरेशन, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य देखील आयोजक म्हणून भूमिका बजावत आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, शीतल तेली-उगले (भा.प्र.से.), आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, सीएफआयचे अध्यक्ष मनिंदर पाल सिंग, एसीसीचे अध्यक्ष अमरजीत सिंग गिल यावेळी उपस्थित होते.

भारताने 'प्रो स्टेज एलिट रेस फॉर मेन्स' या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा व ऑलिंपिक पात्रता गुण शर्यतीचे ऐतिहासिक यजमानपद यशस्वीरित्या मिळवले आहे. प्रस्तावित पुणे ग्रँड टूर (PGT) 2026 ही भारतातील पहिलीच युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (UCI) ने मान्यता दिलेली वर्ग 2.2 वर्गीकरण स्पर्धा असेल, ज्यामध्ये मल्टी-स्टेज रोड रेसचा समावेश असेल.

पुणे ग्रँड टूर 2026, पुढील वर्षी 19 ते 23 जानेवारी दरम्यान होणार आहे. 50 हून अधिक देशाचे सायकलपटू या स्पर्धेत भाग घेणार आहेत. UCIच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये एक ‘एलिट इव्हेंट’ म्हणून राखीव असलेला, पुणे ग्रँड टूर 2026 हा जागतिक सायकलिंगमध्ये भारताचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही स्पर्धा 437 किमी अंतराचे चार स्पर्धात्मक टप्पे पार करेल; ज्यामध्ये शहरी भाग, डोंगराळ प्रदेश व ग्रामीण रमणीय भूप्रदेश अशा विविध ठिकाणी सायकलिंग होईल, सायकलस्वारांच्या सहनशक्तीची परिक्षा घेताना पुणे जिल्ह्याची भौगोलिक विविधता व महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवेल. क्रीडा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा हा उपक्रम ग्रामीण पर्यटनालाही निश्चित चालना देईल.

देशात या खेळाच्या वाढीला गती देण्यासाठी, खेळाडूंना जगातील व्यावसायिक सायकल स्वारांसोबत स्पर्धात्मक वातावरण देण्यासाठी, जागतिक दर्जाची मानके प्रदान करण्यासाठी तसेच उदयोन्मुख सायकलिंग राष्ट्र म्हणून भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी हा उपक्रम महत्वाची भूमिका पार पाडेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande