रायगड जिल्हा सतर्क! खोल समुद्रातील मासेमारी थांबली; मच्छीमारांना इशारा
रायगड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या संभाव्य चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांवर खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या सूचना लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्
रायगड जिल्हा सतर्क! खोल समुद्रातील मासेमारी थांबली; मच्छीमारांना इशारा


रायगड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या संभाव्य चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांवर खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या सूचना लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन केले असून, सध्या सुमारे ३ हजार मासेमारी बोटी सुरक्षितपणे किनाऱ्यावर परतल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.

रायगड जिल्ह्यात एकूण ३५०० मासेमारी बोटी नोंदणीकृत आहेत. यापैकी बहुतेक बोटी बंदरावर किंवा सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आल्या असून, उर्वरित बोटींच्या सुरक्षित परतीसाठी बंदर विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत संपर्कात आहे. चक्रीवादळाचा इशारा मिळताच प्रशासनाने तात्काळ सज्जता दाखवली. सागरी सुरक्षा पथक, स्थानिक पोलीस आणि ग्रामपंचायतींना सतर्कतेचे आदेश दिले गेले आहेत. किनारी गावांमध्ये लाऊडस्पीकरद्वारे मच्छीमारांना इशारे देण्यात येत आहेत.

“सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्व बोटींची नोंद घेण्यात आली असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाकडून पुढील २४ तासांत परिस्थितीचा आढावा घेतला जाईल,” असे सागर पाठक यांनी सांगितले. चक्रीवादळाच्या परिणामामुळे सागरी लाटांची उंची वाढली असून, वार्‍याचा वेगही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावरील सर्व गावांमध्ये प्रशासन सतर्क आहे आणि कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून तयारी पूर्ण ठेवण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande