
सोलापूर, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। सोलापूर महापालिकेतील २६ प्रभागांतील १०२ जागांसाठी आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. या संबंधीचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढले असून, महापालिकांच्या आरक्षण सोडतीचे वेळापत्रकही आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी मुंबई वगळून उर्वरित सर्व महापालिका आयुक्तांना आरक्षण सोडतीबाबतचे आदेश दिले आहेत. त्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आरक्षण सोडतीची प्रक्रिया ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी असणार आहे.आरक्षण सोडतीची जाहीर सूचना ८ नोव्हेंबरला वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ११ नोव्हेंबरला आरक्षणाची सोडत काढली जाईल. आरक्षण सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर केला जाईल. प्रारूप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी १७ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर असा कालावधी असणार आहे. महापालिका आयुक्त अंतिम आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबरची मुदत असणार आहे. त्यानंतर २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड