
नांदेड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘सरदार 150 एकता अभियान’ अंतर्गत 31 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात जिल्ह्यात 31 ऑक्टोबर व 7 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर, तसेच विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
या अभियानांतर्गत भारत सरकारच्या माय भारतच्या नेतृत्वाखाली ‘सरदार@150 युनिटी मार्च’ या देशव्यापी उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. याचे उद्दिष्ट देशातील युवकांमध्ये एकता, देशभक्ती आणि नागरी जबाबदारीची भावना जागृत करणे हे आहे. या मोहिमेद्वारे युवकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि नागरी सहभागातून ‘एक भारत, आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहित केले जाईल.
या कालावधीत पदयात्रा, विविध स्पर्धा आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये डिजिटल फेसवर सोशल मीडिया रील स्पर्धा, निबंध स्पर्धा, सरदार @यंग लीडर्स प्रोग्राम अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा, आरोग्य शिबिरे, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर व्याख्याने, ड्रग्ज मुक्त भारत प्रतिज्ञा इ. उपक्रमांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सांगितले की, “युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट करणे, तसेच विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवा पिढीला सक्रिय योगदान देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.” यावेळी जिल्हास्तरीय पदयात्रा पोस्टरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नांदेड येथे 31 ऑक्टोबर व 7 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 31 ऑक्टोबर रोजी ही पदयात्रा जुना मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनापर्यत काढण्यात येणार आहे. तरी या पदयात्रेत सर्व विद्यार्थी, नागरिक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व विभाग, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis