
सोलापूर, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। जिल्ह्यातील ऊस तोडणी हंगामाला १ नोव्हेंबरपासून सुरवात होणार आहे. जिल्ह्यातील ४० पैकी ३३ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला असून, यामध्ये गेल्या हंगामातील शेतकऱ्यांचे पैसे थकवलेल्या चार कारखान्यांचाही समावेश आहे. जिल्ह्यात एकूण दोन लाख हेक्टर ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. पावसाळा लांबल्यामुळे गाळप हंगाम सुरू करणे हे सर्वांसाठीच कसरतीचे ठरणार आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास सुरवात होत आहे. बहुतांश कारखान्यांनी आपला मोळीपूजन कार्यक्रम उरकला आहे. प्रत्यक्षात गाळप येत्या शनिवारपासून सुरू होणार आहे. गाळप परवान्यासाठी जिल्ह्यातील एकूण ४० पैकी ३३ कारखान्यांनी अर्ज सादर केला आहे.
सध्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी मजूर दाखल होण्यास सुरवात झाली आहे. वाहनधारक आपल्या ऊस तोडणी टोळींची जमवाजमव करत असताना दिसून येत आहेत.जिल्ह्यात एकूण ४० साखर कारखाने आहेत. त्यातील ३३ साखर कारखान्यांनी गाळप परवाना मागितला आहे. तर उर्वरित सात साखर कारखान्यांनी अद्यापही परवाना मागितला नाही. त्यामध्ये बंद असलेला मकाई, संतनाथ, स्वामी समर्थ यासह संत शिरोमणी, भीमा सहकारी, मातोश्री आणि इंद्रेश्वर कारखान्यांनी अद्यापही गाळप परवाना मागितला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड