
रायगड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. या स्पर्धेचे हे सलग २५ वे वर्ष असून, ती राज्यातील दिवाळी अंकांच्या जगतात प्रतिष्ठेचे स्थान मिळवून आहे.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची एक जुनी सांस्कृतिक परंपरा आहे. या परंपरेला प्रोत्साहन मिळावे आणि दर्जेदार अंक प्रकाशित व्हावेत या उद्देशाने गेल्या २४ वर्षांपासून ही राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाही विजेत्यांसाठी भरघोस पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला ५० हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाला ३० हजार रुपये आणि आकर्षक सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. तसेच उत्कृष्ट अंक, विशेषांक, कथा, कविता, व्यंगचित्र, लेख, परिसंवाद, मुलाखत आणि मुखपृष्ठ यांना प्रत्येकी रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह दिले जाणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील अंकांसाठी स्वतंत्र पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी ४० हजार, द्वितीय २० हजार, तृतीय १० हजार तसेच दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी ५ हजार रुपये अशी बक्षिसांची रचना आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिवाळी अंकाच्या दोन प्रती आणि १०० रुपये प्रवेश शुल्कासह १५ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, प्लॉट क्र. ४७५, मार्केट यार्ड, पनवेल येथे संपर्क साधावा किंवा अनिल कोळी (९७६९४०९१६१) यांच्याशी संपर्क करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके