परभणी - राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांच्या अघोरी स्पर्धेमुळे संपूर्ण शहर होर्डिंगच्या विळख्यात
परभणी, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। मुख्य चौकांसह रस्त्या रस्त्यांवर विरोधी असो, सत्तारुढ राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांसह कार्यकर्त्यांनी, त्या पाठोपाठ आता व्यावसायिकांनीसुध्दा अघोरी स्पर्धा सुरु करीत महानगरपालिकेच्या नाकावर टिच्चून ठिकठिकाणी हजारो होर्डींग
राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांच्या अघोरी स्पर्धेमुळेच संपूर्ण शहर होर्डिंगच्या विळख्यात


परभणी, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। मुख्य चौकांसह रस्त्या रस्त्यांवर विरोधी असो, सत्तारुढ राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांसह कार्यकर्त्यांनी, त्या पाठोपाठ आता व्यावसायिकांनीसुध्दा अघोरी स्पर्धा सुरु करीत महानगरपालिकेच्या नाकावर टिच्चून ठिकठिकाणी हजारो होर्डींग झळकवून पुतळ्यांपासून प्रमुख चौक व रस्ते होर्डिंगच्या विळख्यात लूप्त केले आहेत.

महानगरपालिका हद्दीतील मुख्य चौकांसह रस्त्या रस्त्यांवर किंवा अन्य इमारतींवर बेकायदेशीरपणे होर्डिंग उभारणार्या पक्षांसह संस्था व प्रतिष्ठान व मंडळांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर यांनी होर्डींग उभारणार्‍या एजन्सीधारकांना वारंवार दिला. त्यामुळे संपूर्ण महानगरातील बेकायदा होर्डींग तातडीने हटविले जातील, असे अपेक्षित होते. दुर्देव असे, हे बेकायदा होर्डींग हटले तर नाहीच, उलटपक्षी संपूर्ण महानगरातील प्रमुख चौक व रस्त्या रस्त्यांवर दुतर्फा, इमारतींवर किंवा महापालिकेच्या पथदिव्यांच्या पोलवरच विरोधी असो, सत्तारुढ राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांसह कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षभरापासून बेकायदेशीरपणे होर्डींग झळकावण्याची अघोरी स्पर्धाच सुरु केली.

वसमत रस्ता, जिंतूर रस्ता, गंगाखेड रस्ता तसेच मध्यवस्तीतील रेल्वे स्टेशन रस्त्यासह नानलपेठ कॉर्नर, छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, क्रांती चौक, अष्टभूजा चौक, नारायण चाळ कॉर्नर तसेच छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात शेकडो बेकायदा होर्डींग खूलेआमपणे झळकविल्या जात आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरातसुध्दा होर्डींगधारकांनी उच्छाद मांडला आहे. त्याचा परिणाम मुख्य चौक व रस्ते या होर्डींगमध्ये अक्षरशः लूप्त झाले आहेत. सर्वत्र छोट्या मोठ्या आकाराचे हे होर्डींग वाहतूकीच्या दृष्टीने धोकादायक ठरले असतांनासुध्दा राजकीय पक्षांच्या पुढार्यांसह कार्यकर्त्यांना त्याचे काडीचेही सोयर सुतक नाही, उलटपक्षी या राजकीय पक्षांचे आजी माजी लोकप्रतिनिधी व पुढारीच कार्यकर्त्यांना जागा दिसेल त्या ठिकाणी होर्डींग उभारण्याचा सल्ला देऊ लागले आहेत.

काही दिवसांपूर्वी वसमत रस्त्यावरील दुभाजकातील पोलवर एका मंत्र्याच्या स्वागताच्या प्रित्यर्थ झळकविलेल्या होर्डीगचा धक्का बसल्याने एका नागरीकास डोळा गमवावा लागला, परंतु त्या घटनेतून काही बोध घेण्याऐवजी राजकीय पक्षांच्या पुढारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या नाकावर टिच्चून दिसेल त्या ठिकाणी बेकायदेशीर होर्डींग झळकविल्याचे घाणेरडे प्रकार सुरुच ठेवले आहेत. एका विद्यमान लोकप्रतिनिधीने ओल्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका प्रेसनोटद्वारे कार्यकर्त्यांना होर्डींग उभारु नका असा सल्ला दिला. त्या सल्ल्याचा उलटाच परिणाम झाला. संपूर्ण शहरभर कार्यकर्त्यांनी साहेबांना शुभेच्छा देण्याकरीता होर्डींग झळकवून निष्ठा व्यक्त केल्या. एकंदरीत या अघोरी स्पर्धेमुळे सपूर्ण शहर हे विद्रुप दिसू लागले आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त नाार्वेकर हे नुसते इशारे बहाद्दर ठरू लागले आहेत. इशारे देण्यापलिकडे ते या होर्डींगधारकांविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई करावयास आजपर्यंत धजावले नाहीत. त्यांच्या प्रमाणेच महापालिकेचे अन्य उपायुक्त व वरिष्ठ अधिकारी या बाबत मौन बाळगून बसले आहेत. दररोज ठिकठिकाणी मुख्य चौक व रस्त्यांवरील हे होर्डींग नजरेस पडून सुध्दा महापालिका मूग गिळून आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचे जे आहे ते सौंदर्यीकरण नष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande