गाळप हंगाम सुरू केल्याप्रकरणी पाच कारखान्यांना नोटीस
पुणे, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यातील ऊस गाळप हंगाम अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वीच पाच साखर कारखान्यांनी विनापरवाना गाळपाला सुरुवात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील या कारखान्यांवर साखर आयुक्तालयाने कारवाईची प्रक्रिया
गाळप हंगाम सुरू केल्याप्रकरणी पाच कारखान्यांना नोटीस


पुणे, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यातील ऊस गाळप हंगाम अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वीच पाच साखर कारखान्यांनी विनापरवाना गाळपाला सुरुवात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील या कारखान्यांवर साखर आयुक्तालयाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून, संबंधितांना सुनावणीसाठी बोलाविण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री समितीच्या बैठकीत गाळप हंगाम २०२५-२६ हा एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्यापूर्वीच काही कारखान्यांनी गाळपास सुरुवात केल्याने साखर आयुक्तालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण, ऊस गाळप व ऊस पुरवठा नियमन) आदेश १९८४ नुसार, कोणत्याही साखर कारखान्याने गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे. या संदर्भातील परिपत्रक आयुक्तालयाने ऑगस्ट महिन्यात सर्व सहकारी आणि खासगी कारखान्यांना पाठविले होते. मात्र, काही कारखान्यांनी नियमांचे उल्लंघन करून विनापरवाना गाळप हंगाम सुरू केल्याची माहिती पुणे आणि सोलापूर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांकडून देण्यात आली. साखर आयुक्तालयाकडून आता या कारखान्यांविरुद्ध कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कारवाईपूर्वी कारखान्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. या अनुषंगाने सर्व संबंधित कारखान्यांना आयुक्तालयात आवश्यक कागदपत्रांसह आणि अद्ययावत गाळपाच्या माहितीसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती साखर प्रशासन विभागाच्या संचालकांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande