
रत्नागिरी, 29 ऑक्टोबर, (हिं. स.) : देवरूख येथे सरस्वती ॲकॅडमीने प्रभाकर सनगरे यांनी देवरूखमधील चित्रकारांना प्रदर्शन भरवून चांगले व्यासपीठ मिळवून दिले आहे. या कलाकारांच्या चित्रांचे प्रदर्शन रत्नागिरीच्या तारांगणमध्ये भरवू, अशी ग्वाही राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी दिली.
प्रदर्शनात सहभागी झालेले कलाकार प्रवीण हर्डीकर,सुरेंद्र ऊर्फ भाऊ शिंदे, कुमार भाट्ये, दीक्षा सागवेकर यांची चित्रे अप्रतिम आहेत. या चित्रांचे मोफत प्रदर्शन रत्नागिरीतील तारांगणमध्ये भरवून ही कला सर्वदूर पोहचवण्याचे काम करू, असेही श्री. सामंत म्हणाले. श्री. सामंत यांनी आवर्जून प्रदर्शनाला भेट देऊन कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, राजेंद्र महाडीक, माजी नगरसेवक वैभव पवार, बाबू मोरे, बापू शिंदे, विलास मोरे, रोहन हर्डीकर आदी उपस्थित होते.यावेळी राजेंद्र महाडीक यांनी या कलाकारांच्या कलाकृतींच्या विक्री व्यवस्थेसाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. रोहन बने म्हणाले, देवरूखमधील या कलाकारांसाठी जी लागेल ती मदत करू. अशा कलाकारांचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.प्रदर्शनाला जिल्हाभरातून कलारसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. चित्रे विकत घेऊन कलाकारांना प्रोत्साहन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी