मुंबई, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)।
कॉन्टिलो पिक्चर्स आणि इल्युजन रिअॅलिटी स्टुडिओज यांच्या बॅनरखाली तयार झालेला बहुप्रतीक्षित 3D अॅनिमेशन चित्रपट ‘महायोद्धा राम’चे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रभु श्रीरामांच्या जीवनावर आधारित हा भव्य चित्रपट या दिवाळीत, 17 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाची खासियत म्हणजे बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी या अॅनिमेटेड पात्रांना आपला आवाज दिला आहे.
कुणाल कपूर – श्रीराम
जिम्मी शेरगिल – लक्ष्मण
मौनी रॉय – माता सीता
मुकेश ऋषी – हनुमान
गुलशन ग्रोवर – रावण
रझा मुराद – महर्षि विश्वामित्र
याशिवाय रामायणातील इतर महत्त्वाच्या पात्रांना देखील दिग्गज कलाकारांच्या आवाजातून साकारण्यात आलं आहे.
प्रोड्यूसर आणि कॉन्टिलो पिक्चर्सचे संस्थापक अभिमन्यु सिंह यांनी सांगितलं, “प्रभु श्रीराम हे फक्त मर्यादा पुरुषोत्तमच नाहीत तर ते एक महान योद्धाही होते. या चित्रपटातून आम्ही त्यांच्या त्या ‘महायोद्धा’ रूपाची ओळख जगासमोर आणत आहोत. श्रीराम हे भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगातील श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक आहेत.”
चित्रपटाचं दिग्दर्शन रायजादा रोहित जयसिंह वैद यांनी केलं असून निर्मिती अभिमन्यु सिंह आणि रूपाली सिंह यांनी केली आहे. कथा आणि पटकथा समीर शर्मा यांची आहे. दमदार संवाद वरुण ग्रोवर आणि राहुल पटेल यांनी लिहिले आहेत. गीतकार जावेद अख्तर यांच्या गीतांना आदेश श्रीवास्तव यांनी संगीत दिलं आहे, तर बॅकग्राऊंड स्कोर सौविक चक्रवर्ती यांनी दिला आहे. चित्रपटाचं वितरण सिनेपोलिस इंडिया करणार आहे.
हा चित्रपट या दिवाळीत हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये एकाचवेळी वर्ल्डवाइड रिलीज होणार आहे.
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर