मुंबई, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। दस-याच्या शुभमुहूर्तावर २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या ऋषभ शेट्टीच्या बहुप्रतीक्षित कांतारा – चॅप्टर 1 या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी केली आहे. या चित्रपटाने केवळ एका दिवसात तब्बल ६० कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून हिंदी पट्ट्यातून जवळपास १९ ते २१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
या भव्य ओपनिंगमुळे कांतारा – चॅप्टर 1 ने यावर्षीच्या हिंदी बिग ओपनिंग फिल्म्स छावा (३१ कोटी) आणि सैयारा (२२ कोटी) यांना मागे टाकले आहे. मात्र हा चित्रपट पवन कल्याणच्या दे कॉल हिम ओजी (६३.७५ कोटी) आणि रजनीकांतच्या कुली (६५ कोटी)पेक्षा किंचित कमी ठरला.
होम्बले फिल्म्सच्या बॅनरखाली विजय किरागंदूर आणि चालुवे गौडा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. कांतारासारखा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर ऋषभ शेट्टी यांनी या प्रीक्वलमध्ये दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिकेची जबाबदारी निभावली आहे. त्यांच्यासोबत रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया आणि जयराम हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाला बी. अजनीश लोकनाथ यांचे संगीत आणि सुरेश यांचे संपादन लाभले आहे.
गौरतलब म्हणजे, २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या कांतारासाठी ऋषभ शेट्टी यांना राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळाला होता. त्यामुळे कांतारा – चॅप्टर 1 कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या असून, पहिल्याच दिवशीच्या यशस्वी कामगिरीनंतर हा चित्रपट आगामी दिवसांत आणखी नवे विक्रम प्रस्थापित करेल अशी खात्री व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर