मुंबई, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘कांतारा – चॅप्टर 1’ ने २ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होताच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. हाऊसफुल्ल चित्रपटगृह आणि सोशल मीडियावर मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद याचा उत्तम पुरावा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळी छाप सोडू शकला आहे.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, मेकर्सनी या फ्रँचायझीचा तिसरा भाग अधिकृतरित्या घोषित केला आहे. ही बातमी चाहत्यांमध्ये उत्साह वाढवत आहे. सध्या या नवीन भागाची रिलीज तारीख जाहीर केलेली नाही. अहवालानुसार, ऋषभ शेट्टी यांनी आपल्या पुढील चित्रपटाचे नाव ‘कांतारा : ए लिजेंड – चॅप्टर 2’ ठेवले आहे.
जसे ‘कांतारा – चॅप्टर 1’ हे २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ चा प्रीक्वल होता, त्याचप्रमाणे नवीन चॅप्टरसुद्धा प्रीक्वल स्वरूपाचे असेल, पण तो ‘कांतारा – चॅप्टर 1’ चा थेट सिक्वेल मानला जाईल. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये एका मुलाचा अपूर्ण प्रश्न उरला होता, आणि त्याच्यावर आधारित तिसऱ्या भागाची पायाभरणी झाली आहे.
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ ने फक्त बॉक्स ऑफिसवरच धुमाकूळ घातला नव्हता, तर समीक्षकांकडूनही प्रचंड कौतुक मिळवले होते. केवळ १६ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट जगभरात ४०७.८२ कोटी रुपयांची कमाई करून ब्लॉकबस्टर ठरला होता. तसेच, याला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते – सर्वोत्कृष्ट अभिनेता (ऋषभ शेट्टी) आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट.
आता ‘कांतारा – चॅप्टर 1’ चे यश आणि तिसऱ्या भागाची अधिकृत घोषणा या फ्रँचायझीला आणखी बळकट बनवेल. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत की ऋषभ शेट्टी आपल्या पुढील अध्यायात कोणती गाथा घेऊन येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर