मुंबई, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। अभिनेता जितेंद्र कुमारच्या आगामी ‘भागवत’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यातील जितेंद्रचा अनोखा लुक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता. आता या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला असून, प्रेक्षकांना जितेंद्रचा भयावह आणि कधीही न पाहिलेला अवतार पाहायला मिळत आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीला अरशद वारसी एका आक्रमक पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतो. तो ज्या तुरुंगात कार्यरत आहे, तिथे तो एका कैद्याला इतके मारहाण करतो की त्याचा मृत्यू होतो. याच दरम्यान त्याला कळते की एका व्यक्तीची मुलगी गायब झाली आहे. अरशद त्या वडिलांना आश्वासन देतो की १५ दिवसांत तो मुलगी परत आणेल.
यानंतर जितेंद्र कुमारची एंट्री दाखवली जाते. साधासुधा, निरागस दिसणारा जितेंद्र एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यांच्या रोमँटिक क्षणांचे काही दृश्ये दाखवली जातात. परंतु लवकरच अरशद वारसी त्याला अटक करतो. जितेंद्रवर अनेक मुलींना पळवून नेण्याचे आरोप होतात आणि प्रकरण कोर्टात पोहोचते. कोर्टात मात्र जितेंद्र कोणत्याही वकिलाची मदत न घेता स्वतःच केस लढायचे ठरवतो.
ट्रेलरमध्ये पुढे अनेक थरारक वळणं आणि ट्विस्ट दाखवले गेले आहेत. यात जितेंद्रचा भयावह लुक प्रेक्षकांना चकित करतो. याशिवाय, अरशद वारसी आणि जितेंद्र कुमार यांची जोडी पडद्यावर एक वेगळीच जादू निर्माण करताना दिसते.
हा क्राईम-थ्रिलर चित्रपट १७ ऑक्टोबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर