
अमरावती, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : अमरावती येथे १ व २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनातून अमरावती जिल्ह्याला स्वतःचा पक्षी मिळणार आहे. या संमेलनाच्या आयोजक संस्थेच्या अध्यक्ष डॉ. अंजली देशमुख आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
अमरावतीत दुसऱ्यांदा आयोजित हे संमेलन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष वरिष्ठ सनदी अधिकारी तथा प्रख्यात पक्षीमित्र प्रवीण परदेशी असतील. त्यांच्या उपस्थितीत राज्यभरातील पक्षीमित्र आपापल्या भागातील पक्षीवैभव सादर करतील आणि पक्षी संवर्धनासाठी शासनाकडून अपेक्षित सहकार्याबाबतचा ठराव संमत करतील.अमरावती जिल्ह्याचे वैभव असलेल्या मेळघाट जंगलात तणमोर, रानपिंगळा, सारस आणि माळढोक हे प्रमुख पक्षी आढळतात. याव्यतिरिक्त जिल्ह्याच्या विविध जंगलांमध्ये एकूण ४०० पक्ष्यांच्या प्रजाती असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राज्यात एकूण ६०० पक्ष्यांच्या प्रजाती असून, देशभरातील पक्ष्यांची संख्या १ हजार ३३४ वर पोहोचली आहे.
आयोजकांच्या अंदाजानुसार, या संमेलनासाठी आतापर्यंत अडीचशे प्रतिनिधींनी नोंदणी केली असून, अखेरच्या क्षणापर्यंत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावेळी वेक्सचे कोषाध्यक्ष डॉ. गजानन वाघ, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत वऱ्हेकर, सदस्य मनीष ढाकुलकर आणि ॲड. राजमेहेर निशाने उपस्थित होते.पक्षी निरीक्षण, वन्यजीव आणि वन क्षेत्रातील दिग्गज पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून संमेलनाच्या परिसराला 'पद्मश्री मारुती चितमपल्ली नगरी' असे नाव देण्यात आले आहे. तसेच, ज्या सभागृहात हा कार्यक्रम होईल, त्या सभागृहाला डॉ. सलीम अली यांचे नाव देण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी