
नाशिक, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। निवडणूक आयोगाने भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागू नये, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ब्रिज किशोर दत्त यांनी केला.
विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर सुरू असलेल्या 'वोट चोर गद्दी छोड' अभियानाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे बिटको चौक येथे स्वाक्षरी मोहीम व आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा प्रभारी ब्रिज किशोर दत्त, शहराध्यक्ष आकाश छाजेड, प्रदेश सचिव राहुल दिवे आणि ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष किरण जाधव यांनी केले.
लोकशाहीचा अपमान आणि जनादेशाचा विश्वासघात झाल्याचा आरोप करत आंदोलनादरम्यान 'वोट चोर सरकार हाय हाय!', 'लोकशाहीचा अपमान बंद करा !' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काँग्रेसने या मोहिमेद्वारे जनतेकडून स्वाक्षऱ्या गोळा करून निवडणूक आयोग व राज्यपालांना निवेदन पाठविण्याची घोषणा केली. या प्रसंगी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत म्हटले की, जनतेच्या मतांचा अपमान करून सत्तेत बसणाऱ्यांना नैतिक अधिकार नाही. अशा सरकारने तात्काळ सत्ता सोडावी.यावेळी शिवसेना उबाठा गटाचे योगेश गाडेकर, योगेश देशमुख,विक्रांत थोरात, डॉ. सुरेश पाटील, कुसुम चव्हाण, आशा तडवी, अनिल बहोत, जावेद पठाण, प्रशांत गांगुरडे, शिवाजी गंभीरे, प्रकाश खळे, संतोष ठाकूर, गौरव सोनार, उषा साळवे, रोज शर्मा, सॅम्युअल औतडे, अॅड सूर्यवंशी आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV