
चंद्रपूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।
भद्रावती तालुक्यातील शेगाव (खु.), चंदनखेडा – मुधोली – मोहर्ली हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने गावक-यांसाठी तर महत्वाचा आहेच, मात्र ताडोबात येणा-या देश- विदेशातील पर्यटकांसाठी सुध्दा अतिशय सोयीचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात या रस्त्याच्या रुंदीकरणाला आणि सुशोभिकरणाला मंजुरी दिली. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी असलेल्या या रस्त्याचे काम प्रामाणिकपणे करून रस्त्याची गुणवत्ता व दर्जा उत्कृष्ट राखा, अशा सुचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या.
बुधवारी शेगाव (खु.) येथे रस्त्याच्या रुंदीकरण कामाचे भुमिपुजन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, तहसीलदार योगेश कौटकर (वरोरा), बालाजी कदम (भद्रावती), कार्यकारी अभियंता अक्षय पगारे, सहा. कार्यकारी अभियंता जय तिवारी, सरपंच मोहित लभाणे आदी उपस्थित होते.
अर्थसंकल्पात नागपूर विभागात केवळ या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्वांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले. शेगाव – चंदनखेडा- मुधोली – मोहर्ली या रस्त्याचा प्रश्न 2025 पासून प्रलंबित होता. तसेच याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. राज्य शासनाने या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. गावक-यांसाठी अतिशय उपयोगी असलेल्या या रस्त्याचे बांधकाम अतिशय गुणवत्तापुर्वक व दर्जेदार व्हायला पाहिजे. रस्त्याबाबत कोणतीही तक्रार येऊ देवू नका. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामावर नियमितपणे लक्ष ठेवावे, अशाही सूचना पालकमंत्री डॉ. वुईके यांनी दिल्या.
तत्पुर्वी पालकमंत्र्याच्या हस्ते कुदळ मारून रस्त्याच्या बांधकामाचे भुमिपूजन करण्यात आले. प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता अक्षय पगारे म्हणाले, या रस्त्यासाठी अर्थसंकल्पात 85 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 33 किमी लांबीच्या या रस्त्यामुळे गावखेड्यातील नागरिक आणि ताडोबाला येणा-या पर्यटकांना फायदा होईल.
दळणवळणासाठी अतिशय महत्वाचा रस्ता : खासदार प्रतिभा धानोरकर
राज्य शासनाने बजेटमधून भद्रावती तालुक्यात हे काम मंजूर केले आहे. अनेक गावे आणि ग्रामपंचायती या रस्त्यावर असून दळणवळणासाठी हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले. शेगाव, चंदनखेडा, मोहर्ली, जुनोना, कोलारा गेटकरीता हा रस्ता सोयीस्कर आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी अतिशय चांगले काम करावे, असेही त्या म्हणाल्या.
पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश : आमदार करण देवतळे
या अर्थसंकल्पात संपूर्ण राज्यात 15 रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाने मंजुरी दिली. यात नागपूर विभागातून केवळ भद्रावती तालुक्यातील शेगाव, चंदनखेडा, मुधोली या रस्त्याचा समावेश करण्यात आला. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या रस्त्याने अनेक पर्यटक ताडोबाला येत असतात. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण आवश्यकच होते. अधिका-यांनी रस्त्याच्या कामाची गती ठेवून दर्जेदार काम करावे, असे आमदार करण देवतळे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव