पालघर : सफाळे परिसरात सीएनजी पंप उभारण्याची नागरिकांची मागणी
पालघर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे नागरिक सीएनजी (CNG) इंधनाव
सफाळे परिसरात सीएनजी पंप उभारण्याची नागरिकांची मागणी


पालघर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे नागरिक सीएनजी (CNG) इंधनावर चालणाऱ्या वाहनांना अधिक पसंती देत आहेत. मात्र, पालघर तालुक्यातील सफाळे परिसरात सीएनजी पंपांचा अभाव असल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सध्या सफाळे पूर्वेकडील पारगाव येथे वगळता इतर कुठेही सीएनजी पंप उपलब्ध नाही. त्यामुळे या भागातील खाजगी वाहनचालक, रिक्षाचालक तसेच सीएनजीवर चालणाऱ्या प्रवासी वाहनचालकांना सीएनजी भरण्यासाठी लांब अंतराचा प्रवास करावा लागतो. यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम या तिन्हींचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.या समस्येची दखल घेत माकूणसार-प्लॅटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत भोईर यांनी सफाळे भागात सीएनजी पंप उभारण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, “सफाळे हे वेगाने विकसित होणारे केंद्र असून येथे नागरिकांची आणि वाहनांची संख्या वाढत आहे. अशा ठिकाणी सीएनजी पंपांची कमतरता ही मोठी समस्या बनली आहे. प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करून या भागात किमान दोन ते तीन सीएनजी पंप उभारावेत,” अशी मागणी त्यांनी केली.स्थानिक नागरिकांचाही या मागणीला जोरदार पाठिंबा मिळत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, वाढत्या महागाईच्या काळात सीएनजीसारखे स्वस्त आणि पर्यावरणपूरक इंधन सहज उपलब्ध झाल्यास सर्वसामान्यांचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका होईल.सध्या या मागणीवर प्रशासनाची प्रतिक्रिया अपेक्षित असून, लवकरच सफाळे परिसरात नवीन सीएनजी पंप उभारले जातील, अशी नागरिकांची आशा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande