
जळगाव, 30 ऑक्टोबर (हिं.स.) अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे ही पावसाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता ही स्थिती कमी झाल्यानंतर परत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ या चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मुक्काम दोन दिवस वाढण्याची शक्यता आहे. यामुळे थंडीचं आगमनही लांबलं आहे.जळगाव जिल्ह्यात दिवाळीपूर्वी तापमानात घट होऊन थंडीची चाहूल लागली होती. किमान तापमान २० अंशाखाली गेलं होते. मात्र दिवाळीनंतर जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यातच तापमानातही वाढ झाल्याने उकाडा काहीसा वाढला आहे. जिल्ह्यात अद्यापही पावसाचं सावट कायम असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, १ नोव्हेंबरपर्यंत जळगाव जिल्ह्यात पावसाची व ढगाळ वातावरणाची स्थिती कायम राहू शकते. २ नोव्हेंबरनंतर ही स्थिती बदलायला लागेल. जिल्ह्यात पूर्णपणे कोरडे हवामान निर्माण होण्यासाठी ४ नोव्हेंबरनंतरच शक्यता आहे. या दरम्यान येऊ घातलेली थंडी देखील गायब झाली आहे.जिल्ह्यात थंडीचे आगमन लांबले आहे. ४ नोव्हेंबरनंतरच जिल्ह्यात उत्तरेकडील वारे पुन्हा सक्रिय होऊन थंडी सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर