
अंतिम चौकशीसाठी पर्यवेक्षकांची नेमणूक
अमरावती, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : नगर पालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचे उघड झाले असून, एकूण ४११ आक्षेप नगर पालिका प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता पर्यवेक्षक नेमणूक करून अंतिम चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे. पर्यवेक्षकाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मतदार याद्या अंतिम करण्यात येणार आहेत.
नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीस वेग आला असून, नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या आरक्षणासह प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर आता मतदार याद्या हा पुढील टप्पा आहे. ८ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात गेल्याने किंवा काही प्रभागातील मतदार इतरत्र हलवले गेल्याने गोंधळ निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या संख्येने आक्षेप नोंदवले असून, प्रशासनाकडून १२ प्रभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात दोन कर्मचारी आणि एक बीएलओ यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी घराघरांत जाऊन पंचनामे करून माहिती प्रशासनाकडे सादर केली आहे. मतदार याद्यांतील गोंधळामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असून, अनेकांनी आपले नाव आणि पत्ता तपासण्याची विनंती केली आहे. प्रशासनानेही घराघरांत जाऊन सत्यापनाची प्रक्रिया सुरु केली आहे. या चौकशीमुळे चुकीची नोंद, पुनरावृत्ती (दोन ठिकाणी नाव ) समोर येणार आहेत. अंतिम अहवालानंतरच मतदार यादी ठरवली जाईल, ज्यामुळे आगामी नगर पालिका निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया योग्य आणि न्याय्य होईल. नागरिक आणि राजकीय पक्ष दोन्ही याकडे लक्ष ठेवून आहेत.
कोणत्या प्रभागात किती मतदार मतदार याद्या निश्चित झाल्यानंतर कोणत्या प्रभागात किती मतदार असणार आहेत. हे निश्चित झाल्यानंतर प्रभागात कोणत्या उमेदवाराचे प्राबल्य असणार आहे हे समजणार आहे, त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाचे मतदार अंतिम याद्यांमध्ये लक्ष लागून आहे. मतदार याद्यांतील गोंधळामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. यामुळे आता या याद्यामधील हा गोंधळ दुर करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. या प्रकारामुळे नागरिकांनाही मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे हा गोंधळ अडचणीचा ठरत आहे.
चुकीच्या प्रभागात नाव गेल्यामुळे भीती पालिका प्रशासनाने आक्षेपांची चौकशी करण्यासाठी परिवेक्षक नेमले आहेत. ते प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम अहवाल सादर करतील. या अहवालानंतर मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे आता या चौकशीच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये मतदार याद्यांच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चुकीच्या प्रभागात नाव गेल्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी