
अमरावती, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : अमरावती मधून पुण्याकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या दिवाळीत परतीच्या मार्गावरील प्रवाशांची लूट करत आहेत. ट्रॅव्हल्स चालकांनी गर्दीचा फायदा घेत भाड्यात तब्बल सहा पट भाडे वाढ केली आहे. प्रवासी वेळेत परत पोहोचण्यासाठी नाइलाजाने हे भाडे देऊन प्रवास करत आहेत. प्रवाशांना भूर्दंड सहन करावा लागत असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.मात्र अमरावती प्रादेशिक परिवहन विभाग नेहमी प्रमाणे कोमात गेला असल्याचे समोर आले आहे. शहरातून पुण्यासाठी ये- जा करणाऱ्या २५ ते ३० पेक्षा अधिक ट्रॅव्हल्स कायमस्वरूपी प्रवासी वाहतूक करत आहेत. शहरातील अनेक ठिकाणी या ट्रॅव्हल चालकांनी तिकीट बुक करण्यासाठी आपआपली दुकाने थाटली आहेत. जी मंडळी या दुकानापर्यंत येवू शकत नाही ती मंडळी ऑनलाइन रेड बस वर तिकीट बुक करु शकते. रेड बस व या दुकानात थोडफार दरात फरक पडतो, त्यामुळे अनेक मंडळी ही ऑनलाइन बुकींगलाच पसंती देते. परिणामी ट्रॅव्हल मध्ये सातत्याने गर्दी होत आहे. या ठिकाणाहून प्रवासी वाहतूक करणाऱ्या महामंडळाच्या अनेक बस या रिकाम्या धावत असतात. या वाहतुकीमुळे महामंडळाला चांगलाच फटका बसतो. सुरुवातीला कमी भाडे आणि अधिक सुविधांचे आमिष दाखवत या खासगी ट्रॅव्हल्सने आपल्याकडे प्रवासी खेचण्यात यश प्राप्त केले आहे. परंतु सण, उत्सव आला की शहरातून नागरिकांची गर्दी वाढत असते. सर्व नियम धाब्यावर सर्व नियम धाब्यावर बसवून ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी सुरु असून याकडे आरटीओचे दुर्लक्ष होत आहे. नुकत्याच स्लीपर असलेल्या वेगवेगळ्या दोन बसला आग लागल्याने ४० जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना या अशाच प्रकारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या स्लीपर मधील होत्या. वास्तविक पाहता शहरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्वच ट्रॅव्हल्स या स्लीपर आहेत. दिवाळीचा सिझन सुरु होण्यापूर्वी अनेकांनी जुन्या गाड्या नवीन बनवल्या आहेत. त्यांची कागदपत्रे, प्रवासी वाहतुकीसाठी असलेली मानांकने पूर्ण केली आहेत की नाही? आग लागल्यास विझवण्याची सामग्री आहे की नाही? यासारख्या अनेक गोष्टी प्रवाशांना तर माहिती नाहीतच. परंतु संबंधित प्रशासनातील पोलिस व तत्सम यंत्रणा यांना माहिती आहे का? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी