
परभणी, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रीय एकता दिवस आणि आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने “रन फॉर युनिटी” या भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे गोमाता पूजनाने झाली. या वेळी पालकमंत्री सौ. मेघनादीदी बोर्डीकर, माजी मंत्री सुरेशराव वरपूडकर, भाजप परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, डॉ. केदार खटिंग आणि सौ. प्रेरणाताई वरपूडकर यांच्या हस्ते पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते “रन फॉर युनिटी” पदयात्रेला शुभारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सुरू झालेली ही यात्रा गांधी पार्क येथे संपन्न झाली. या पदयात्रेत हजारो परभणीकरांनी उत्साहाने सहभाग घेत राष्ट्रीय एकता, अखंडता आणि देशभक्तीचा संदेश दिला.
या प्रसंगी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिक यांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. शहरात सर्वत्र देशभक्तीचे घोष, झेंडे आणि “एक भारत, श्रेष्ठ भारत” या घोषवाक्यांनी वातावरण दुमदुमले.
कार्यक्रमाचे आयोजन भाजप परभणी महानगर यांच्या वतीने करण्यात आले असून, कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis