
अकोला, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।
ऐन सणासुदीच्या दिवसांत नागरिकांच्या ताटात भेसळमुक्त, सुरक्षित अन्न पोहोचावे यासाठी अन्न व औषध प्रशासनावर जबाबदारी अधिक असते. या विभागाने सतत दक्ष राहायला हवे, पण वास्तव अगदी उरफाटे होत असून अन्न व औषध प्रशासननाच्या दिवाळीत अकोलेकरांच्या आरोग्याचे दिवाळे निघत असतांना कार्यालयात एकही अधिकारी हजर नसल्याचे व कार्यालयाचा कारभार लिपिक आणि चपराशी यांच्या भरोशावर असल्याचे पाहायला मिळते.
सणासुदीच्या दिवसांत नागरिकांच्या ताटात भेसळमुक्त, सुरक्षित अन्न पोहोचावे यासाठी अन्न व औषध प्रशासनावर जबाबदारी अधिक असते. खाद्य पदार्थ, अन्न सुरक्षा तपासणी, परवाने, निरीक्षण, नमुने संकलन यासारखी महत्त्वाची कामे अन्न व औषध प्रशासनाकडून करणे अपेक्षित असताना मात्र सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारीच कार्यालयातून गायब असल्याचे वास्तव चित्र पाहायला मिळते, दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई, तेल, फरसाण आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीचा धोका वाढतो. अशा वेळी अधिकारीच गायब असतील तर नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नागरिकांनी जेव्हा तक्रार द्यायची म्हटली, तेव्हा कार्यालयात तक्रार स्वीकारणारे कोणीच नसल्याचे दिसले. तक्रार कुणाकडे करायची? दाद कोणाकडे मागायची? असा आक्रोश नागरिकांकडून होत असून काहींनी तर प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे भेसळखोरांना मोकळे रान मिळाल्याचा थेट आरोप केलाय. अन्न व औषध प्रशासन हे सध्या ' बेभरवशाचे कार्यालय' ठरत असल्याची जनतेत भावना आहे. अशात अधिकाऱ्यांची दिवाळी साजरी होत असताना, नागरिकांच्या आरोग्याची दिवाळी निघत आहे, अशी उपहासात्मक चर्चा सुरू आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाण्याची पूर्ण शक्यता असताना अधिकारीच गायब असल्याने व सोयीने उपलब्ध होत असल्याने भेसळ खोरांचे चांगलेच फावते आहे. या बेफिकीर अधिकाऱ्यांवर राज्य सरकार आणि जिल्हाधिकारी यांनी कठोर कारवाई करून जबाबदार चौकशी करावी, अशी मागणी नागरिक व ग्राहक संघटनांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे