
जळगाव, 31 ऑक्टोबर (हिं.स.) : जळगावातील निवृत्ती नगर येथील केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाचा शुभारंभ 4 नोव्हेंबर रोजी रात्री ९.३७ वाजता होणार आहे. या उत्सावासाठी मंदिरात जोरात तयारी सूरू आहे. भाविकांना मंदिर दर्शनासाठी ०४ नोव्हेंबर रात्री ९.३७ पासून ते ०७ नोव्हेंबर सकाळी ६.५२ वाजेपर्यंत प्रवेश मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील हे एकमेव अयप्पा स्वामी मंदिर असून, येथे प्राणप्रतिष्ठा पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने केली गेली आहे. प्रत्येक वर्षी कार्तिक पौर्णिमेचा शुभ मुहूर्त केरळमधील गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली निश्चित केला जातो, ही या मंदिराची खास परंपरा आहे.या वर्षी पौर्णिमा व कृतिका नक्षत्राचा योग असून पौर्णिमा ०४ नोव्हेंबर रात्री ९.३७ पासून ते ०५ नोव्हेंबर संध्याकाळी ७.२० पर्यंत असून, कृतिका नक्षत्र ०६ नोव्हेंबर सकाळी ८.३२ पासून सूरू होवून ७ नोव्हेंबर सकाळी ६.५२ वाजेपर्यंत राहील, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले आहे. या कालावधीत शहरातील मान्यवरांच्या हस्ते विविध पूजा आणि अभिषेक विधी पार पडणार आहेत.मंदिरात महाबलीपुरम (तामिळनाडू) येथून मंगवलेली कार्तिकस्वामीची मूर्ती, तसेच कोटायम तंथनम प्रतिकृती, मथुराई मिनाक्षी देवी आणि गुरूवायुर श्री विष्णू यांच्या मूर्ती विराजमान आहेत. या सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा जानेवारी २००० मध्ये तामिळनाडू येथील गुरूजींच्या हस्ते पार पडली होती.भाविकांकडून धन, सोने आणि चांदी या तीन प्रकारच्या अभिषेकांसाठी चिल्लर पैसे गोळा केले जातात. चेन्नईहून मागविलेल्या १०८ नाण्यांद्वारे सोने-चांदी अभिषेक केला जातो. या काळात दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते, म्हणून हजारो भाविक नवस फेडण्यासाठी येथे येतात.हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. गेल्या २५ वर्षांपासून कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिर केरळी पद्धतीने सजवून भाविकांसाठी खुले केले जाते. मंदिरात नवग्रह व इतर देवतांची मंदिरेही असून, ती वर्षभर दर्शनासाठी खुली असतात. या उत्वसावी जोरदार तयारी सूरू असून भाविकांच्या सुविधेसाठी गुरूजी, मंडम,रोषणाईचे काम सूरू आहे तरी भाविकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर