
अकोला, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
अकोला शहरातील निमवाडी गणेश घाट हा दरवर्षी भक्तिभावाने उजळून निघतो. हजारो भाविक गणपती बाप्पांच्या जयघोषात श्रींचे विसर्जन करतात. मात्र या वर्षीचा गणेशोत्सव संपून दोन महिने उलटले असतानाही घाटावर मूर्तींचे अवशेष, सजावट, थर्माकॉल व प्लॅस्टिकचा कचरा तसाच पडून आहे. पावसामुळे या वस्तू सडल्याने परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि धार्मिक वेदना पसरल्या आहेत.
“ज्यांना आपण भक्तिभावाने पूजतो त्या श्रींच्या मूर्तींचे अवशेष उघड्यावर पडलेले पाहणे ही केवळ दुर्लक्षाची बाब नाही — ही आपल्या श्रद्धेची, संस्कृतीची आणि पर्यावरणाची हाक आहे.”
असे भावनिक शब्द अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि “स्वच्छ अकोला, सुंदर अकोला” अभियानाचे संयोजक निलेश देव यांनी त्यांच्या निवेदनात आयुक्त, अकोला महानगरपालिका यांना लिहिले आहेत.
निलेश देव यांनी स्पष्ट केले की, विसर्जन काळात महानगरपालिकेने तयारी केली असली तरी विसर्जनानंतर घाटावरील अवशेष हटवले गेले नाहीत. काही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आजही न विसर्जित अवस्थेत आहेत. “ही केवळ अस्वच्छतेची नाही, तर आपल्या संस्कृतीच्या विटंबनेची वेदनादायक बाब आहे,” असे ते म्हणाले.
या पार्श्वभूमीवर त्यांनी घाटावर उरलेल्या मूर्तींचे अमोनियम बायकार्बोनेट द्रव वापरून पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्याची तातडीची मागणी केली आहे. या पद्धतीने मूर्ती वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे विघटित होतात आणि पाण्याचे प्रदूषण टळते. अनेक नगरपालिकांनी ही पद्धत यशस्वीरीत्या वापरली असून, अकोल्यातही ती अमलात आणण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
निमवाडी गणेश घाटाची तातडीने संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी.
मूर्तींचे अवशेष, सजावट व प्लॅस्टिक कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावावी.
उरलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे अमोनियम बायकार्बोनेट द्रव वापरून विसर्जन करण्यात यावे.
पुढील वर्षांपासून ही प्रणाली नियमितरित्या लागू करावी.
विसर्जनानंतर घाट स्वच्छतेसाठी निश्चित कालावधी निश्चित करून ती जबाबदारी नियमित पार पाडावी.
निलेश देव यांनी सांगितले की, “ही मागणी तक्रार नसून हिंदू संस्कृती, श्रद्धा आणि पर्यावरण रक्षणाची सामूहिक हाक आहे.”
त्यांनी पुढे मा. आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांचे विशेष कौतुक केले की, त्यांच्या पुढाकारामुळे यंदा अकोल्यात १०,००० मातीच्या गणेशमूर्तींची स्थापना झाली — ही अकोल्याच्या इतिहासातील मोठी पर्यावरणपूरक झेप ठरली आहे.
“स्वच्छ अकोला, सुंदर अकोला” या अभियानाच्या माध्यमातून निलेश देव व त्यांची टीम शहरभर स्वच्छतेचे, संस्कृती-जतनाचे आणि पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या भावनिक आवाहनाला नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत असून, निमवाडी गणेश घाट तातडीने स्वच्छ करून श्रींच्या मूर्तींचे सन्मानपूर्वक व पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
“श्रींच्या मूर्तींची हीच हाक — ‘मला नदीत नाही, तर निसर्गाच्या सन्मानात विसर्जित करा!’”
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे