
अमरावती, 31 ऑक्टोबर (हिं.स.) : यंदा जुलै महिन्यांपासून जिल्ह्यात पावसाने कहर सुरू केला आहे. अतिपावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र अजूनही पावसाचा कहर काही थांबला नाही.बुधवारी मध्यरात्री ते गुरुवारी पहाटेपर्यंत शहरासह परिसरातील बडनेरासह जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अमरावतीत ६० तर बडनेरात ७३ मिमी पावसासह अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतात असलेल्या कपाशीलाही आता फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या अरबी समुद्रावर मोथा वादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातच अवकाळीने हजेरी लावली आहे. दरम्यान बुधवारी मध्यरात्री दीड वाजतापासून शहर व जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. या वेळी काही भागात सलग एक ते दोन तास जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे बडनेरा व मंगरूळ चव्हाळा या दोन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी