
जळगाव , 31 ऑक्टोबर (हिं.स.)जिल्ह्यातील बोगस शालार्थ प्रणाली घोटाळ्याच्या तपासासाठी नाशिक रोड आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जळगावात दाखल झाले असून, आठ ते दहा शाळांच्या मुख्याध्यापकांना चौकशीची नोटीस बजावण्याची तयारी सुरू आहे. मात्र, मुख्याध्यापक चौकशीस हजर न राहिल्याने पथकाचा मुक्काम जळगावात वाढवावा लागला आहे. बोगस शालार्थ आयडी व बनावट मान्यता आदेशांद्वारे शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्याचा संशय निर्माण झाल्याने शिक्षण विभाग व पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. या प्रकरणात अमळनेर, एरंडोल, मुक्ताईनगरसह जिल्ह्यातील आठ ते दहा शाळांचा समावेश असल्याचे समजते.नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी ३१ ऑक्टोबर रोजी जळगावात दाखल झाले. त्यांनी संबंधित मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाच्या माध्यमातून तपासासंदर्भात नोटीस स्विकारण्यासाठी पाचारण केले. मात्र, एकही मुख्याध्यापक प्रत्यक्ष हजर झाला नाही. काहींनी आजारीपणाचे, अपघाताचे किंवा इतर कारणे सांगून टाळाटाळ केली. यामुळे पोलिसांनी ‘शाळेतील अन्य कर्मचारी, जसे की लिपिक वा शिपाई, यांनाही नोटीस स्विकारण्यास सांगितले’, त्यानंतर काही ठिकाणी शिपायांमार्फत नोटीसा स्विकारण्यात आल्या. दरम्यान, नाशिक पोलिस पथकाने जळगावात मुक्काम वाढवून तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. या प्रकरणात काही शाळांनी शालार्थ मंजुरी आदेश आणि मान्यता कागदपत्रे बनावटरीत्या सादर केली असल्याची प्राथमिक शंका असून, पुढील काही दिवसांत अधिकाऱ्यांची चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू होणार आहे. या संपूर्ण कारवाईमुळे जिल्हा शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर